Maval News: उपद्रवी पर्यटकांकडून तिकोना गडावरील दरवाजाची मोडतोड

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात गडकिल्ले पर्यटनासाठी बंद करण्यात आलेले असताना काही उपद्रवी पर्यटकांनी तिकोना गडावर जाऊन गडप्रेमींनी बसवलेल्या दरवाजाची मोडतोड केली. रविवारी (दि. 3) सकाळी गडपालांच्या ही बाब निदर्शनास आली.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. दरम्यान देशभरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली. गडकिल्ले देखील बंद करण्यात आले. मावळ तालुक्यातील तिकोना गड देखील बंद करण्यात आला होता.

मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मावळातील गडकिल्ले, लेण्या तसेच इतर पर्यटन स्थळे पुढील आदेश होईपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करत गडप्रेमी देखील गडावर जात नव्हते.

मागील दोन वर्षांपूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग यांनी तब्बल 60 हजार रुपये खर्च करून तिकोणागडावरील बालेकिल्ल्यावर जाणा-या मार्गावर भक्कम दरवाजा बसवला होता. यामुळे गडाच्या वैभवात भर पडली होती. काही उपद्रवी पर्यटकांनी हा दरवाजा तोडून किल्ल्यावर प्रवेश केला. हा प्रकार रविवारी गडपाल गुरूदास मोहोळ यांच्या निदर्शनास आला. त्यांनी गडसंवर्धन करणाऱ्या संस्थेला माहिती दिली आहे.

गडकिल्ले आपल्या इतिहासाची साक्ष आहेत. त्यांच्या संवर्धनातून आपला इतिहास राखण्याचा काही संस्था आणि गडप्रेमी अविरत प्रयत्न करीत आहेत. अशामध्ये काही उपद्रवी लोक अशी नासधूस करून गडप्रेमींच्या भावनांना तसेच इतिहासाला धक्का देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.