Maval News: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सुरू होणार मावळ तालुक्यातील पर्यटन

पर्यटनावर बंदी घालणारा सात जूनचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्द

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील पर्यंटन स्थळांवर घातलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील आदेश आज जारी केला. 

मावळ हा निसर्गसंपन्न तालुका असून पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता लोणावळा-खंडाळा या शहरासह आंदर मावळ, पवन मावळ नाणेमावळ या ग्रामीण भागातील डोंगरदर्‍यांमध्ये येत असतात.

यावर्षी देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सात जून 2020 रोजी प्रतिबंधात्मक आदेश काढून पर्यटनाला बंदी घातली होती. त्यामुळे चांगला पाऊस होऊनही पर्यटन बंद असल्याने व्यापारी व व्यावसायिकांसाठी मात्र हा पावसाळा कोरडा गेला.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.  मावळ तालुक्यातील पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला होता. पर्यटन व्यवसायाने अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे.

पर्यटनाच्या क्षेत्रामुळे स्थानिकांना समाधानकारक रोजगार उपलब्ध झाला होता, मात्र प्रतिबंधात्मक  पर्यटन उद्योगावर संबंधित व्यवसायासमोर अनेक अडचणी उभ्या झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे मावळ तालुक्यातील पर्यटन बंदी शिथिल करण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग यांनी सदर आदेश रद्द करण्याबाबत सहमती दर्शविली आहे.

त्यानुसार पूर्वीचा प्रतिबंधात्मक आदेश रद्द करण्यात आल्याचा नवा आदेश सर्व विभागांना पाठविण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल शेळके यांनी मावळवासीयांच्या वतीने आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.