Maval News : सुसाट दुचाकी भुयारी मार्गात धडकल्याने दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सुसाट दुचाकी भुयारी मार्गात जाऊन धडकल्याने दोन तरुणांचा करुण अंत झाला. ही घटना बुधवारी (दि.14) सकाळी 6:45 वा न्यू इंग्लिश स्कुल समोरील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भुयारी मार्ग वडगाव येथे घडली.

संतोष सूर्यवंशी रा. आंबेडकर कॉलनी वडगाव मावळ यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.

चिरण बहादुर गिरी (वय २६) पुरण मोहनसिंग गिरी (वय ३३) रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ, मूळ नेपाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत.

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार खबर देणारे संतोष सूर्यवंशी नेहमीप्रमाणे चालण्याचा व्यायाम करत असताना, भुयारी मार्गाजवळ विश्रांतीसाठी थांबले असता, त्यांनी भुयारी मार्गात डोकावले असता, एम एच 12 एन जी 5967 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली दिसली. चिरण गिरी व पुरण गिरी बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.

या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिल्यावर घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक दिलीप देसाई, संतोष चामे, पोलीस हवालदार संतोष माने, गणेश तावरे, मनोज कदम आदींनी धाव घेतली. गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. वामन गेंगजे यांनी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष माने करत आहेत. पुरण गिरी हा विक्की बांबू हाऊस याठिकाणी काम करत होता, चिरण गिरी हा मावळ लॅन्ड येथे वॉचमन म्हणून काम करत होता. दोघे विवाहित असुन त्यांना प्रत्येकी 1 लहान मुले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.