Maval News : विसापूर किल्ला जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत…

एमपीसी न्यूज – मावळातील प्रसिद्ध किल्ला विसापूर हा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. शतकानुशतके तो ऊन वारा पाऊस झेलत आहे. परंतु त्याचा आता एक एक भाग ढासळू लागला आहे. त्याच्याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर किल्ला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. मावळात असलेला प्रचंड पाऊस व किल्ल्याकडे असलेले प्रशासकीय दुर्लक्ष त्यामुळे किल्ल्यावरील एक पुरातन वास्तू ही नामशेष होत आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित ‘लोहगड-विसापूर विकास मंच’ यांच्या वतीने विसापूर किल्ल्याची होत असलेली दुरावस्था हा चिंतेचा विषय असून, त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली आहे.

‘विसापूर किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. गडावरील तटबंदी ढासळण्याच्या मार्गावर आहे. त्याच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. ती ढासळुन पर्यटकांचे अंगावर पडल्यास जीवित हानी होऊ शकते. दोन महिन्यापूर्वी किल्ल्यावरील हनुमान मंदिरामागील मोठा भाग कोसळला होता. सुदैवाने त्या ठिकाणी पर्यटक नसल्यामुळे काही हानी झाली नाही तरी आता पुरातत्व विभागाने विसापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धाराला सुरुवात करावी,’ अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार यांनी केली.

विसापूर किल्ल्यावर शिवमंदिर, राजवाडे, दारूकोठार, पाण्याचे टाके, हनुमान मूर्ती, सुंदर तटबंदी असे खूप काही बघण्यासारखे आहे. पावसाळ्यात हा किल्ला खूप सुंदर दिसतो. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वराज्याचा भाग असलेला हा किल्ला, मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला हा किल्ला, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ मुलखातील हा प्रमुख किल्ला याची देखरेख करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.