Maval News:  ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी हक्काचे सभागृह उपलब्ध करू : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – महिला सक्षमीकरण व सबलीकरण गावच्या विकासाचे मुख्य द्योतक असून महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी ग्रामपंचायत परिसरामध्ये महिलांसाठी हक्काचे सभागृह असावे. ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली.

वडगाव येथील मावळ पंचायत समिती सभागृहात सुरू असलेल्या ग्रामपंचायत आढावा बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आमदार शेळके बोलत होते. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीची गावनिहाय आढावा बैठक सुरू असून आज शनिवार (दि.13) रोजी साते, चिखलसे, साई, घोणशेत, टाकवे बुद्रुक, वडेश्वर, कुसवली, डाहुली, खांड, माळेगाव बु., इंगळुन, कशाळ, नवलाख उंब्रे, आंबी, माळवाडी या ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळके यांनी संवाद साधला.

मावळ तालुक्यामध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायती असून ग्रामपंचायतीमध्ये महिलांना हक्काचे सभागृह उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. बचत गट, व्यक्तिमत्व विकास, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठीचे शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, स्वसंरक्षणासाठी धडे, वैचारिक देवाण-घेवाण आदी गोष्टींसाठी महिलांना हक्काची जागा आवश्यक आहे.

परंतु, अद्याप कुठल्याच ग्रामपंचायतीत अशी व्यवस्था नाही. त्यामुळे मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना हक्काचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाबरोबरच गावातील मूलभूत सुविधांचा विकास व्हावा. रस्ते, वीज, पाणी,स्वच्छता, कचऱ्याची समस्या आदी प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिलेल्या जनतेची सेवा करा, असे नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना शेळके यांनी सांगितले.

पुढील आढावा बैठक मंगळवारी होणार असून तालुक्यातील 14  ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधींशी यावेळी संवाद साधला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.