Maval News : आमदार निधीतून रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करणार : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्व आमदारांना आपला एक कोटी रुपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर खर्च करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मावळचे आमदार सुनील शेळके यांनी 30 लाखांची रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचे शिफारस पत्र पुणे जिल्हा नियोजन विभागास दिले आहे.

तसेच तालुक्यातील कान्हे व पवनानगर या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची देखील मागणी केली असून हे दोन्ही प्रस्ताव विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

मावळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची नितांत गरज असताना याच गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे आमदार सुनील शेळके यांनी आमदार निधीतून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमदार निधीतून खरेदी केली जाणारी रेमडेसिविर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी होणारा त्रास व धावपळ थांबणार आहे.

राज्यात ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मावळ तालुक्यात भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी तालुक्यात दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणे गरजेचे आहे. यासाठी मोठा निधी लागणार आहे. तालुक्यातील कान्हे व पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारुन तालुक्याला ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती शेळके यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.