Maval News : घोरावडेश्वर डोंगर परिसरातील वनसंपत्तीची हानी केल्यास कारवाई – रेखा वाघमारे

एमपीसी न्यूज – वनक्षेत्रे हे राष्ट्रीय संपत्ती आहे. तिची हानी केल्यास त्याचा दुष्परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. त्यामुळे वनक्षेत्रात येऊन तिथे उपद्रव केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मानवाच्या अतिक्रमणामुळे वन्य प्राणी मानवी वसाहतीत येत आहेत. अशा प्राण्यांना वनविभागाकडून सुरक्षित वनक्षेत्रात सोडले जात आहे, अशी माहिती मावळ वन विभागाच्या नियतक्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी दिली.

घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला मानवी वसाहतीमध्ये आलेल्या पाच सापांना वन विभाग आणि वन्यजीव रक्षकांनी सुरक्षित वन्य परिक्षेत्रात सोडले. त्यामध्ये दोन कोब्रा, दोन बिनविषारी आणि एक धामीण जातीचे सर्प होते.

आशिष चांदेकर, रितेश साठे, निखील कुंभार, विशाल बोडके, टिपू सुलतान मुजावर, ऋषिकेश शिरसाठ, सिद्धेश मोहिते, आदित्य मोहिते आदी वन्यजीव रक्षकांनी हे काम केले आहे.

याबाबाबत माहिती देताना रेखा वाघमारे म्हणाल्या, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सर्व मंदिरे देखील बंद करण्यात आली. घोरावडेश्वर डोंगरावरील महादेव मंदिर देखील बंद करण्यात आले. तरीही कात्रज, भोर यांसारख्या भागातून लोक घोरावडेश्वर डोंगरावर येत आहेत. नागरिकांना वन विभागाच्या कर्मचा-यांनी अडवल्यास ‘तुम्ही मंदिरात जाण्यासाठी देखील अडवणार का’ असे म्हणून हुज्जत घालतात.

घोरावडेश्वर डोंगर आणि परिसर हे वन परिक्षेत्र आहे. यामध्ये नागरिकांना जाण्यास बंदी आहे. तरीही अनेक उपद्रवी लोक डोंगराच्या विविध भागात जातात. तिथे जाऊन पार्ट्या करणे, दारू पिणे, कचरा करणे, अश्लील वर्तन करणे यांसारखे अनेक उपद्रव करतात.

याच परिसरात तरस, भेकर, ससे, मोर यांसारखे वन्यप्राणी आहेत. नागरिकांच्या या उपद्रवामुळे वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

काही नागरिक वन्य प्राण्यांवर हल्ला देखील करत असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरासमोर वाहने पार्क करून डोंगरावर गोंधळ घालून हे लोक स्थानिक नागरिक आणि वन्यजीव अशा दोघांनाही उपद्रव करीत आहेत.

काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील इथे येऊन गोंधळ घालत आहेत. अश्लील कृत्ये केली जात आहेत. वन विभागाकडून डोंगर परिसरात येणा-या नागरिकांना न येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्रात येऊन वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास संबंधितांवर वन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील वाघमारे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.