Maval News : उद्याच्या भारत बंदला मावळ महाविकास आघाडीचा पाठिंबा

एमपीसीन्यूज ; केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात मावळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने मंगळवारी ( दि. ८) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. या बंदमध्ये मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व व्यापारी, उद्योजक, भाजी विक्रेते, सर्व आस्थापनांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार सुधारणा विधेयक कोणतीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले. ही विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. यामुळे देशातील छोटा व मोठा दोन्ही प्रकारचा शेतकरी अडचणीत सापडून देशोधडीला लागणार आहे.

कंत्राटी फार्मिंगमुळे शेतकरी बहुराष्ट्रीय कंपनीच्या दावणीला बांधला जाणार आहे. देशातील एकूण शेतकरी व्यवस्था संपणार असून भांडवलदार याचा ताबा घेणार आहेत. भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. देशाची सामाजिक सांस्कृतिक जडणघडणाशी शेती निगडीत आहे. पैसेवाले भांडवलदारांच्या हातात ही व्यवस्था देणे हा भाजपच्या केंद्रातील शासनाचा कुटील डाव असल्याच्या आरोप मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

या कायद्याविरोधात पंजाब आणि अन्य राज्यातील शेतकरी बांधव राजधानी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने जमा होऊन आंदोलन करत आहेत. जगाच्या इतिहासातील नोंद घेणारा हा क्षण आहे. विशेषतः पंजाब व हरियाणा येथील शेतकरी पुढाकार घेऊन याचे नेतृत्व करीत आहेत. त्याला संपूर्ण देशातील शेतकरी पाठींबा देत आहेत. मावळच्या शेतकऱ्यांच्यावतीने मावळ विकासाआघाडीच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांनी दि. 8 डिसेंबर  रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मावळ तालुक्यातील सर्व विरोधी पक्ष, शेतकरी, कामगार, खेळाडू, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी, व्यापारी, कारखानदार, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, विविध संघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे शिवसेना तालुका प्रमुख राजू खंडभोर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.