Maval: दिवंगत आईच्या स्मरणार्थ जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीस सुनील भोंगाडे यांच्याकडून एक लाखांची देणगी

Maval: One lakh donation from Sunil Bhongade to District Disaster Response Fund in memory of late mother

एमपीसी न्यूज – “आपण समाजाचे काही तरी देणे लागतो” या भावनेने सामाजिक बांधिलकी जपत भोंगाडे परिवाराच्या वतीने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत आई मीराबाई दशरथ भोंगाडे यांच्या स्मरणार्थ जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीला एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. देणगीचा धनादेश मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व उद्योजक सुनील (नाना) भोंगाडे व परिवाराच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला.

 त्यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे, माळवाडी गावचे माजी उपसरपंच दशरथ नाना भोंगाडे, भामचंद्र डोंगर दिंडी अध्यक्ष हभप सोपानदादा भोंगाडे, माळवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब भोंगाडे तसेच भोंगाडे परिवारातील सर्व सदस्य पाहुणे मंडळी सगेसोयरे उपस्थित होते.

आज (गुरूवारी) माळवाडी गावामध्ये दिवंगत मीराबाई दशरथ भोंगाडे यांचा दशक्रिया विधी झाला. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोंगाडे परिवाराने दशक्रिया विधी दहाव्या दिवशी न धरता पाचव्या दिवशी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत केला. सुरक्षित अंतर पाळून नियमांचे पालन केले.

अशा दुःखद प्रसंगी भोंगाडे परिवाराने देणगी दिल्याबद्दल तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले. बर्गे म्हणाले की इतक्या दुःखात असतानाही हा आदर्श भोंगाडे परिवाराने समाजापुढे ठेवला आहे, असा आदर्श समाजाने त्यांच्याकडून घ्यावा आणि मी ही त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे बोलून सर्व परिवाराचे सांत्वन केले आणि भोंगाडे परिवाराला धन्यवाद देऊन आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.