Maval : कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गव्हाणी घुबडाला पक्षीप्रेमीमुळे मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज- कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गव्हाणी घुबडाला पक्षीप्रेमीमुळे आणि वन्यजीवरक्षक संस्थेच्या सदस्यांमुळे जीवदान मिळाले. त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

नाणोली (नाणे मावळ) येथे सोमवारी (दि. 23) सकाळी आठ वाजता गव्हाणी जातीच्या घुबडाला काही कावळे टोचत आहे असल्याचे पक्षीप्रेमी रामदास वाघुले यांनी पहिले. त्यांनी त्वरित वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य दक्ष काटकर यांच्याशी संपर्क साधला. दक्ष काटकर घटनास्थळी पोहचले आणि त्या कावळ्यांना हुसकावून ते घुबड ताब्यात घेतले. गव्हाणी जातीचे हे घुबड असल्याच निदर्शनास आले.

कावळ्यांच्या हल्ल्यामुळे ते अशक्त झाले होते. काटकर यांनी त्यावर प्राथमिक उपचार केले आणि सायंकाळच्या वेळी त्याला पक्षीमित्र अनिकेत आंबेकर, शंकर आंबेकर, विकास भानुसघरे, ओमकार कडु यांच्या उपस्थितीमध्ये नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

गव्हाणी घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये बार्ण आउल असे म्हणतात. गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. उंदीर, घुशी, सरडे, पाली हे यांचे मुख्य खाद्य आहे. भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले आहे. परंतु इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वत्तेचे प्रतीक मानले जाते असे दक्ष काटकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.