Vadgaon Maval News : मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांचे सदस्यत्व रद्द

व्हीपचा भंग केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांचे सदस्यपद रद्द झाले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते साहेबराव कारके यांनी काढलेल्या व्हीपच्या आदेशाचे शेवाळे यांनी उल्लंघन करून भाजपशी जवळीक केली. त्यानंतर भाजपने त्यांना उपसभापती पदावर संधी दिली.

दरम्यान व्हीपचे उल्लंघन केल्याबाबत कारके यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. यावर निर्णय देत जिल्हाधिका-यांनी शेवाळे यांचे सदस्यपद रद्द केल्याचा आदेश दिला आहे. यामुळे पंचायत समितीतील सत्ताधारी भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते साहेबराव कारके यांनी याबाबत तक्रार केली होती. पंचायत समितीमध्ये भाजपाचे 6 व राष्ट्रवादीचे 4 असे संख्याबळ असल्याने भाजपाची एकहाती सत्ता होती. तरीही दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर राष्ट्रवादीचे सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी भाजपशी घरोबा केला व भाजपने त्यांना उपसभापती पदाची संधी दिली.

त्यावेळी झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकप्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते साहेबराव कारके यांनी पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजावला होता.परंतु या व्हीपचा भंग करून शेवाळे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारके यांनी शेवाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान कारके यांची गटनेता म्हणून निवड केल्याची व व्हीप काढण्याबाबतची सभाच बेकायदेशीर असून त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नाही व व्हीप बजावला नसल्याचेही शेवाळे यांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. परंतु संबंधित बाबी सिद्ध झाल्या नसल्याने कारके यांना व्हीप बजावण्याचा अधिकार असून त्यांनी व्हीप बजावल्याचे सिद्ध झाले.

तसेच शेवाळे यांनी गटनेत्याने बजावलेल्या व्हीपचा भंग केला व पक्षानेही त्यांच्या या कृतीबद्दल क्षमापीत केलेले नाही त्यामुळे शेवाळे यांचे सदस्यत्व रद्द केला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला आहे. या आदेशामुळे भाजपच्या सत्तेला धक्का लागत नसला तरी पक्षाला मात्र धक्का बसला आहे.

दत्तात्रय शेवाळे यांनी केवळ पदासाठी भाजपशी घरोबा करून पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे गटनेता या नात्याने जबाबदारी म्हणून शेवाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे या तक्रारीला न्याय मिळाला असल्याचे साहेबराव कारके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.