_MPC_DIR_MPU_III

Maval: मावळ लोकसभेच्या आखाड्यात ‘शेकाप’ची उडी ?

शेकाप-राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे

(गणेश यादव)

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असून आघाडीसाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी एकास एकच उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. मावळ आणि रायगड लोकसभा मतदार संघावर शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप)वर्चस्व आहे. त्यामुळे मावळ किंवा रायगड या दोन्ही मतदार संघापैकी एका मतदार संघाची शेकापने मागणी केल्याची चर्चा असून मावळ मतदार संघ शेकापला देण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शेकापचे सर्वेसर्वा, आमदार जयंत पाटील यांनी चर्चेतील तपशील उघड करण्यास नकार दिला.

मावळ लोकसभा मतदार संघ हा मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघाचा भाग नवी मुंबईपर्यंत येतो. या मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत-खालापूर यामध्ये तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर, दोन मतदार संघात शिवसेनेचे आणि एका मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मतदार संघाची 2009 मध्ये पुनर्र्चना झाल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. 2009 आणि 2014 मध्ये दोन्ही वेळा पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे मावळात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु, ऐनवेळी युती झाल्यास शिवसेना-भाजप आणि शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक उमेदवार अशी दुरंगी लढत होईल.

आगामी 2019 च्या निवडणुकीत भाजपची लाट थोपविण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. आघाडीबाबत चार दिवसांपूर्वी विरोधकांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत ज्या पक्षाची मतदार संघात अधिक ताकद आहे. त्या पक्षाचा उमेदवार देण्यावर चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या शेकापने रायगड किंवा मावळ या दोन्हीपैकी एक मतदार संघ मागितल्याची चर्चा आहे.

_MPC_DIR_MPU_II

शेकाप राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ आणि रायगड दोन्ही लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी दोन्ही पैकी एक मतदार संघ शेकापला सोडण्याची चिन्हे आहेत. रायगड मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चांगली लढत दिली होती. त्यांचा अवघ्या 1800 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे रायगड मतदार संघ राष्ट्रवादी ‘शेकाप’ला सोडण्याची शक्यता नसून तटकरे यांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे.

मावळ मतदार संघातून 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीचा मानहानीकारक पराभव झाला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी पालिकेसह मावळ मतदार संघातील बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी सत्तास्थानी होती. पक्षाची ताकद होती. तरी, देखील राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे (आता भाजपात आहेत) यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे गजानन बाबर निवडून आले होते. त्यावेळी शेकाप शिवसेनेसोबत होता. त्याचा फायदा बाबर यांना झाला होता. 2014 मध्ये युतीचे श्रीरंग बारणे निवडून आले. तर, राष्ट्रवादीचे आयात उमेदवार असलेले राहुल नार्वेकर आणि शेकाप, मनसेच्या पाठिंब्यावर लढलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव झाला होता. जगताप यांना शेकापचे वर्चस्व असलेल्या घाटा खालच्या भागातून मोठे मताधिक्य होते.

आता मावळ मतदार संघातील गणिते बदली आहेत. शिवसेना, भाजपचे संघटन मजबूत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था गलितगात्र झाली आहे. पिंपरी पालिकेत सत्ता नाही. पक्षाचे संघटन नाही. भाजप, शिवसेनाला टक्कर देऊ शकेल असा सक्षम उमेदवार पक्षाकडे नाही. तसेच सलग दोनवेळा पक्षाचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे घाटाखाली हक्काची ‘व्होट’ बँक असलेल्या शेकापला मावळ मतदार संघ सोडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मावळातून शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एकच उमेदवार असल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना शेकापचे सर्वसर्वो व विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी ‘मावळ आणि रायगड लोकसभा मतदार संघाबाबत अजून कोणतीही बोलणी झाली नसल्याचे सांगत त्यांनी चर्चेतील अधिक तपशील सांगण्याबाबत नकार दिला’

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.