Maval : पार्थ पवार यांचे मत पडणार दुसऱ्याच्या झोळीत !

मावळमधील चार उमेदवार करणार दुसऱ्याला मतदान

एमपीसी न्यूज- मिळणारे प्रत्येक मत हे उमेदवारासाठी लाखमोलाचे असते. स्वतःचे एक मत सुद्धा प्रत्येक उमेदवारासाठी तितकेच महत्वाचे असते. पण उमेदवार असूनही स्वतःचे मत स्वतःला देता येऊ शकणार नाही असे चार उमेदवार मावळ मतदार संघामध्ये आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा समावेश आहे. त्यांचे नाव बारामती विधानसभा मतदार संघात आणि ते उभे आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून. त्यामुळे त्यांचे स्वतःचे हक्काचे मत आता त्यांना दुसऱ्याच्या झोळीत टाकावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदान प्रक्रियेला फक्त आठ दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जात आहे. एकेका मतासाठी उमेदवार जीवाचे रान करीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चार उमेदवार असे आहेत की, ज्यांना स्वतः ऐवजी इतरांना मतदान करावे लागणार आहे.

भारतीय नागरिक देशाच्या कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो. स्वत:च्या मतदारसंघातून विजय मिळण्याची शक्यता नसली की सुरक्षित मतदारसंघ गाठून विजय मिळवला जातो हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे.

मावळ मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे पार्थ पवार यांच्या विरोधात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे उभे ठाकले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. परंतु, पार्थ यांच्यासह हे सर्वजण बारामती मतदार संघातील मतदार आहेत. त्यामुळे या सर्वांना, इतकेच काय पार्थ यांना देखील स्वतःला मत देता येणार नाही. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील हे अलिबाग येथील मतदार आहेत. अपक्ष उमेदवार डॉ. सोमनाथ पोळ, राकेश चव्हाण हे अंधेरी येथील तर सूरज खंदारे हे यवतमाळ येथील मतदार आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतःचे मत स्वतःला देता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like