Maval : सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण, परस्पर विरोधी तक्रारी दाखल

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या सुनील शेळके यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याला गुरुवारी (दि. 5) रात्री वराळे येथे मोटारीतून आलेल्या काही तरुणांनी पाईप व लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात तो कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्पेश मराठे (वय 29, रा. वराळे, ता. मावळ) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. कल्पेश यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप भेगडे, बेल्लू उर्फ अजय भेगडे, प्रतीक नारायण भेगडे, अविष्कार भेगडे, अनिकेत अंकल भेगडे व अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कल्पेश गुरुवारी रात्री शिवकॉलनी मित्र मंडळ येथे गणपतीच्या आरतीसाठी गेले. आरती झाल्यानंतर ते मित्रांसोबत गप्पा मारत असताना आरोपी कार आणि दोन मोटारसायकलवरून आले. ‘ये इकडे ये, लय माज आलाय का. तू त्या सुनील शेळकेच्या मागे फिरतो का’ असे म्हणत सर्वांनी मिळून लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये मराठे यांचे दोन्ही पाय, एक हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेले. कल्पेश यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्पेश यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याच्या परस्पर विरोधात प्रतीक नारायण भेगडे (वय 24, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्पेश मराठे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक गुरुवारी रात्री तळेगाव दाभाडे येथून मंगळूर येथे जात होते. वराळे फाटा येथे गाडी आली असता रस्त्यात साचलेले पाणी रस्त्याने पायी चालत असलेल्या इसमाच्या अंगावर उडाले. यामुळे रस्त्याने जाणा-या इसमाने मोठ्याने आवाज दिला. आवाज ऐकून प्रतीक यांनी गाडी थांबवली. गाडीमुळे खड्ड्यातील चिखल उडाल्याबद्दल प्रतीक यांनी पायी जात असलेल्या इसमाची माफी मागितली.

तरीही आरोपीने प्रतीक यांना शिवीगाळ करत ‘तुम्हाला लय माज आलाय का. मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही भेगडे आहात. तुमचा माज उतरवतो.’ अशी धमकी दिली. तसेच आरोपीने जवळच पडलेल्या मंडपाच्या बांबूने प्रतीक यांना पोटावर, पाठीवर, पायावर मारले. यात प्रतीक यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्यांची साखळी आरोपीने हिसकावून घेतली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

मारहाण करणाऱ्यांमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याने या प्रकरणामुळे मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुनील शेळके यांनी या प्रकरणी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर आरोप केला असून मावळची जनता दादागिरी व दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने व प्रेमाने लढवावी, असे आवाहनही शेळके यांनी केले आहे.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेळके यांचे आरोप फेटाळून लावले असून तात्कालिक कारणावरून काही तरुणांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.