Maval: कंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे!

Maval: Poultry farm Owners urged MLA to help in the recovery of their dues from companies!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सुमारे 1200 पोल्ट्री व्यावसायिकांच्या थकीत रकमा संबंधित कंपन्यांकडून त्यांना त्वरित मिळवून देण्यासाठी  मावळ अ‍ॅग्रो कंपनी आणि मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने आमदार सुनील शेळके यांना साकडे घातले आहे. संबंधित कंपन्यांशी चर्चा करून पोल्ट्री व्यावसायिकांना थकबाकीची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले आहे, अशी माहिती संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे (गुरुजी) यांनी दिली.

कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात अनेक कंपन्यांनी मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची देणी थकविल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. या कंपन्यांना त्वरीत थकित रक्कम देण्यास भाग पाडावे, अशी मागणी करणारे निवेदन मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने आमदार  शेळके यांना दिले.

मावळ अ‍ॅग्रोचे संस्थापक तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे यांनी आमदार सुनील शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या 16-17 वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. परंतु कोरोनामुळे तो व्यवसाय अडचणीत सापडला आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांत चिकनबाबत समाज माध्यमातील अनेक अफवांमुळे हा व्यवसाय बंद पडला आहे.

पोल्ट्री व्यावसायिकांनी या काळात ज्या कंपन्यांशी करार करून पक्षी सांभाळले होते ते काही कंपन्यांनी नेले नाहीत. तर काहींनी ते पक्षी वा-यांवर सोडून द्यायला सांगितले तर  काहीं कंपन्यांनी बाजारातील अफवांमुळे अतिशय अल्प दरात पक्षी उचलले. दोन ते तीन महिने झाले तरी, काही कंपन्यांनी पोल्ट्री मालकांना अद्याप त्यांचे पेमेंट दिले नाही. कोरोना लाॅकडाऊन संदर्भात विविध कारणे देत पेमेंट देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीला तोंड देत आहेत.

आपल्या मतदारसंघात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल व रोजगारी निर्माण झालेली आहे. मावळात पोल्ट्री व्यवसायात असलेल्या कंपन्यांना आपल्या माध्यमातून समज देऊन ज्या पोल्ट्री मालकांची पेमेंट दिलेली नसतील अशा कंपन्यांना समज देऊन शेतक-यांचे पेमेंट मिळवून देण्यासाठी मदत व सहकार्य करण्याची विनंती ही निवेदनात करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.