Lonavala : इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेला लोणावळ्यातील उगमस्थानापासून सुरुवात

मावळ प्रबोधनी व मावळ वार्ता फाऊंडेशनचा पुढाकार

एमपीसी न्यूज- वर्षानुवर्षापासून श्वास गुदमरलेल्या पवित्र इंद्रायणीला जलपर्णीमुक्त करत नदीपात्रातील गाळ व कचरा काढण्याच्या कामाला मावळ प्रबोधनी व मावळ वार्ता फाऊंडेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. इंद्रायणीच्या उगमस्थानापासून हे काम सुरु करण्यात आले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला होता. लोणावळा शहरातून उगम पावणार्‍या इंद्रायणी नदीला देहू, आळंदी या भागात अनन्यसाधारण महत्व आहे. लाखो वारकरी या नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, कामशेत, तळेगावातील पाणीयोजना या नदीवर आहेत, अशा या इंद्रायणी नदीला उगमस्थानापासूनच जलपर्णीचा विळखा पडला आहे. त्यातच लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सर्व ड्रेनेजचे पाणी या नदीपात्रात सोडल्याने नदीला गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरात जवळपास 19 ठिकाणी नदीपात्रात नाले व ड्रेनेज लाईन सोडण्यात आल्या आहेत.

जलपर्णी सोबत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पात्र उथळ व अरुंद बनले आहे. या इंद्रायणी माईचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याकरिता मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी पुढाकार घेतला असून नदीपात्र सफाईसाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करुन दिली आहे. नदीपात्र सफाई सोबत पात्राला दुतर्फा सुरक्षाभिंत बांधण्याचा देखील या दोन्ही संस्थाचा मनोदय आहे.

इंद्रायणीचे उगमस्थान हे तीर्थक्षेत्र व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगितले. नदीपात्राची सफाई झाल्यानंतर लोणावळा शहराच्या सौदर्यात मोठी भर पडणार असून भविष्यात त्याठिकाणी बोटिंगच्या माध्यमातून नगरपरिषद पर्यटन विकास देखील साधू शकते, याकरिता शहरातील तसेच मावळ भागातील सामाजिक संघटना, नागरिक, दानशूर व्यक्ती यांनी या पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.