Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

मावळ तालुका शिवसेनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) कार्ला येथे एकविरा देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच एकवीरा गडावर आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी सभापती शरद हुलावळे यांनी मागणीचे निवेदन दिले आहे.

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा. मुंबई-पुणे महामार्ग चारवर वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत अनेकांचे अपघातात बळी गेले आहेत. याठिकाणी दरवर्षी हजारो एकविरा भक्त दर्शनासाठी येतात. तसेच कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाणारे हजारो पर्यटक कार्ला फाट्यावरुनच ये-जा करत असतात. तसेच कार्ला परिसरातील 20 हजार नागरिकांचाही हा नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक आहे.

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी, टाकवे एमआयडीसी, कान्हे, उर्से, नांगरगाव (लोणावळा) येथे एमआडीसी आहे. या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधण्य देण्यात यावे. मावळमधील धरण ग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत.

कान्हे रेल्वे उड्डाणपूलाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्राकडून निधीची तरतूद केली आहे. राज्य सरकारने देखील निधीची तरतूद करावी. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.