Maval: सुट्टीच्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी; पवारांची रॅली, बारणे यांचा भेटी-गाठीवर भर 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आज (रविवार) सुट्टीच्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली.  मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज पिंपळेसौदागर परिसरातील नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. तर, आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी रॅली काढली. 
मावळ लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदार संघ आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ आणि घाटाखालील उरण, पनवेल, कर्जत असे सहा विधानसभा मतदारसंघ या मावळमध्ये येतात. लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारफे-या, भेटी-गाठीवर भर देत मतदारसंघ पिंजून काढला जात आहे.
  • मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज रविवारचा मुहुर्त साधत पिंपरी-चिंचवड शहरात भेटी-गाठीवर भर दिला. बारणे यांनी पिंपळेसौदागर येथे आयटीयन्सशी संवाद साधला. रहाटणीतील बागेत फेरफटका मारला. गाठी-भेटीवर, सामाजिक संस्थांतर्फे मतदानाच्या टक्केवारी वाढावी यासाठी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतला. क्रिकेटच्या मैदानात जाऊन बॅटिंग केली. पिंपळेसौदागर परिसरातील नगरसेवकांच्या घरी, सोसायट्यामध्यये जाऊन गाठीभेटीवर भर दिला. आकुर्डी, तळेगावमध्ये देखील गाठीभेटी घेतल्या. पिंपरी येथील प्रचारकार्यालयात शिवसेना-आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरात प्रचार रॅली काढली. भक्ती शक्ती चौकातील शिवाजी महाराज- संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली होती. संपूर्ण शहरात ही रॅली काढण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.