Maval: पर्यटनाला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य करा ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात विविध पर्यटन क्षेत्रे आहेत. या पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. कार्ला, भाजे लेणी या प्राचीन गुहा, राजमाची, लोहगड, विसापूर, तिकोणा या किल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. तसेच रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने मदत केल्यास हा किल्ला पाहण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरात जाईल, असेही ते म्हणाले.

2020-2021 या वर्षासाठीच्या पर्यटन क्षेत्राच्या नियंत्रणाधीन अनुदानाच्या मागणी व मतदान’ या विषयावर लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी प्रसिद्ध मोठी पर्यटन स्थळे आहेत. माथेरानमध्ये मिनी ट्रेन चालते. या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. मात्र, पाणी, रस्त्यांची सुविधा नाही. येथे रोपवेची सुविधा केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. कार्ला, भाजे या प्राचीन गुहा आहेत. मुंबईच्या जवळ घारापुरी येथे एलिफंटा गुफा असून, याठिकाणी रस्ते करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चार किल्ले मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. राजमाची, लोहगड, विसापूर, तिकोणा या किल्ल्यांवर जाण्यासाठी सुधारणा केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. महाराष्ट्र सरकारने रायगड किल्ल्याची सुधारणा करण्यासाठी प्राधिकरण बनविले आहे. त्याला केंद्र सरकारने मदत केल्यास हा किल्ला पाहण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात जाईल. तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळांची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकाने एक पुस्तक काढले पाहिजे. प्रत्येक राज्यातील पर्यटनाची त्यामध्ये माहिती असावी. सगळ्या राज्यातील भाषेत हे पुस्तक असावे, अशी अपेक्षा खासदार बारणे यांनी व्यक्त केली.

तसेच कार्ला गुफा येथे एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. येथे लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सध्या या मंदिराच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. मावळातील समुद्रा किनारा देखील सुधारण्याची आवश्यकता आहे, असेही बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.