Maval : पुणे महानगर विकासाचा केंद्रबिंदु – पालकमंत्री गिरीश बापट

सोमाटणे फाटा ते पणनरस्ता, सांगवी ते जांभूळ रस्ता, कोथुरणें ते मळवंडी ठुले रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ८ कोटी रस्त्यांची विकासकामे

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील मावळ तालुक्यातील सांगवी ते जांभूळ रस्ता (ग्रा.मा१२७) ता. मावळ ०/०० ते ३/५०० व सोमाटणे फाटा ते पणन महामंडळ तळेगाव ग्रामा १२१, किमी ०/०० ते २/००, तसेच कोथुर्ने ते मळवंडी ठुले (ग्रा. मा. ७७, ता. मावळ) ०/०० ते ३/८०० या रस्त्यांचे भूमीपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत रविवारी दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पार पडले.

यावेळी कार्यक्रमास मंत्री, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, तथा अन्न औषध प्रशासन, संसदीय कार्ये ,पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे, महानगर आयुक्त किरण गित्ते, सभापती गुलाब म्हाळसकर, जि.प. सदस्य बाबुराव वायकर, उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार, जांभूळ सांगवी सरपंच अश्विनी ओव्हाळ, उपसरपंच अंकुश काकरे, अधीक्षक अभियंता चंद्रकांत जावळे, कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर, तसेच समस्त सोमाटणे, तळेगाव दाभाडे, जांभूळ व सांगवी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, पीएमआरडीए विकासाचा केंद्रबिंदू आहे. नागरिकांना पायाभूत सोईसुविधा जसे पाणी, रस्ते, वीज उपलब्ध करून देण्याचे काम पीएमआरडीए करीत आहे. पंतप्रधान आवास योजनेतून आता स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. १०० कोटी रुपये रस्ते विकाससाठी राखीव ठेवले आहेत. नियोजनबद्ध विकासाची गंगा आता पुणे महानगरमधून अशीच अविरत सुरू राहणार आहे. ग्रामीण भागात राहूनच स्थलांतरित न होता सर्व सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच रस्त्यांचे व मेट्रोचे जाळे शहरात निर्माण केल्यास विकासाची दिशा निश्चित होण्यास मदत होईल. ज्यामुळे वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होण्यास मदत होईल.

त्यानंतर महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, पुणे महानगर प्राधिकरणाने रिंगरोड, मेट्रो, रस्ते ,पाझर तलाव, कचरा व्यवस्थापन अशा प्रकारची विकासकामे हाती घेतली आहेत. विकास शुल्कातून रस्त्यांची विकासकामे केली जात आहेत. झोनदाखला, गावठाणात बांधकामे करताना परवानगी घेऊन कामे करा. आम्ही त्यासाठी क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत. त्यामाध्यमातून निधी उभा राहील. टीडीआर आणि एफएसआय जागा मालकांना देऊनच रस्ते विकसित केले जाणार आहेत. पीएमआरडीए आणि ग्रामपंचायत मिळून निधी वापरल्यास एकमेकांच्या सहकार्यानेच कामे होणार आहेत.

यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पीएमआरडीएच्या माध्यमातून विकासकामे केली जातील. मावळ तालुक्यासाठी तीन रस्त्यांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे.’

पुणे मुंबई महामार्गालगत रस्ते विकासाची कामे- :
सोमाटणे ते तळेगाव दरम्यान नागरिकांना ८ किलोमीटर पर्यंतचा वळसा घालून जावे लागत होते. सदर रस्ता मुंबई-पुणे हायवे मार्गाला जोडला जात असल्याने आता दीड ते दोन किलोमीटर पर्यंत फक्त अंतर कापावे लागणार आहे. वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच सांगवीकडून जांभूळ एमआयडीसीकडे जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाल्याने सोयीचे होणार आहे. या रस्त्याचे बांधकाम झाल्यास जांभूळ व सांगवी गावांमधील नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच म.औ.वि.म. क्षेत्रातील जाणा-या वाहनांची सोय होईल. तसेच सोमाटणे व तळेगाव गावांमधील नागरिकांनाही या रस्त्याचा फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.