Maval : बाळा भेगडे व रवींद्र भेगडे यांच्यात अखेर दिलजमाई! रवींद्र भेगडे घेणार माघार !

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी शमविण्यात अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असून पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे व बंडखोर उमेदवार रवींद्र भेगडे यांच्यात दिलजमाई झाली आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी रवींद्र भेगडे त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे हे भाजप उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले होते.

माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे असलेल्या रवींद्र भेगडे यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काल (रविवारी) मुंबईत बोलवून घेतले होते. रवींद्र भेगडे यांच्यावर झालेला अन्याय लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रवींद्र भेगडे यांनी उपसलेली बंडाची तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला.

आपण सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. यापुढेही पक्षाच्या आदेशाचे पालन करणार आहोत. उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर केली आहे. आता आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे रवींद्र भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.