Maval : जोरदार शक्ती प्रदर्शन करत रवींद्र भेगडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे आणि भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील अनेक वर्ष पक्षाचे तन- मन- धनाने काम करुन देखील पक्ष संघटनेकडून दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त करत रवींद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या मावळ भाजपा संघटनेला यावेळी प्रथमच जोरदार धक्के बसले आहेत. इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर घड्याळ मनगटावर बांधत राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आहे. भाजपमध्ये उमेदवारी वरुन मोठी रस्सीखेच सुरु होती.

राज्यमंत्री बाळा भेगडे, सुनील शेळके व रवींद्र भेगडे या तिन्ही इच्छुकांनी मागील महिनाभर मावळ तालुका पिंजून काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. कोण निवडून येणार?, यापेक्षा कोणाला उमेदवारी मिळणार?, या चर्चेला मावळात उधाण आले होते. यामध्ये सलग तिसर्‍यांना उमेदवारी मिळवत बाळा भेगडे यांनी शेळके आणि भेगडे यांना धक्का दिला असला तरी त्यांना रोखण्याकरिता मावळात मोठी रणनिती आखली जात असल्याने हॅट्रिक मारण्याकरिता बाळा भेगडे यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.