Vadgaon Maval : टाकवे येथील इंद्रायणी नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी

एमपीसी न्यूज- अंडर मावळला जोडणारा टाकवे कान्हे येथील इंद्रायणीनदीवरील ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. शासनाच्या विविध विभागाकडे मागणी करूनही या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही वेळी हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व धोकादायक पुलाच्या सर्वेक्षणामध्ये टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. सेवा फाऊंडेशनच्या वतीने आंदरमावळ मधील सर्व ग्रुप ग्रामपंचायत, दवाखाने ,शाळा कंपन्या यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालय, खासदार, आमदार, रस्ते बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी केली. विविध वृत्तपत्रांमधून बातम्या छापण्यात आल्या. मात्र या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले.

आता पुलाच्या भिंतीमध्ये वडाची,पिंपळाची झाडे उगवली असून पूल आणखी धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज ये-जा करणारे नागरिक, व्यावसायिक, कंपन्यांची वाहने जीव मुठीत धरून प्रवास करतात. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ? असा संतप्त सवाल सेवा फाऊंडेशनकडून विचारला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.