Maval : गड संवर्धनाच्या कामासाठी तिकोणागडावरील बालेकिल्ल्यावर प्रवेश बंद

एमपीसी न्यूज – तिकोणा गडावरील बालेकिल्ल्यावर जाणा-या पाय-यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचे काम संपेपर्यंत गडप्रेमींना गडावरील बालेकिल्ल्यावर जाता येणार नाही. हे काम सुरू असताना केवळ गडावरील तळजाई माता मंदिरापर्यंतच गडप्रेमींना जाता येणार आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले तिकोणागडावर गडसंवर्धनाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातील पहिला व मोठा टप्पा म्हणजे बालेकिल्ल्यावर जाणा-या पाय-यांच्या दुरुस्तीचे काम आज (मंगळवार) पासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे तिकोणा गडाला भेट देणाऱ्या गडप्रेमींना बालेकिल्ल्यावर जाता येणार नाही.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांच्या प्रयत्नातुन तिकोणा गडावर वेळोवेळी दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. मागील काही दिवसांपासून गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. तसेच गडावरील तटबंदीची पडझड झाली होती. तटबंदीवर झाडे वाढली असल्याने ती झाडे काढणे गरजेचे आहे. वरील संस्थांच्या मदतीने या गडावर संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीने कामे केली जात आहेत. त्यातूनच पाय-यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवप्रेमी, गडप्रेमींनी या कामाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1