Maval : तिकोणा गडावरील पाय-यांचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय गडकिल्ल्यांचे संवर्धनातील मोठे पाऊल टाकत तिकोणागड बालेकिल्ल्यावरील जिर्ण व धोकादायक झालेल्या पाय-या मावळ्यांनी लोकवर्गणी करून बांधून काढल्या. या पाय-यांचा जीर्णोद्धार सोहळा आज (सोमवारी) विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला.

श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे यांच्या हस्ते या पाय-यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन जोशी, मिलींद क्षीसागर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, डॉ. प्रमोद बो-हाडे, नगरसेवक प्रविण चव्हाण, राजेद्र कुडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  • सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत, त्यानंतर वेताळ महाराज, चपेटदान मारूतीराया, तळजाई माता, वितंडेश्वर यांचे पुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाय-यांचे उदघाटन करण्यात आले. धर्मविर शंभूराजे प्रतिष्ठान करूंज यांच्या लहान मुलींनी शिववंदना घेतली. तळजाई माता परिसरात सर्वांनी पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बाल मावळा प्रणय शिंदे याने पोवाडा सादर केला. शाहीर हनुमंत देशमुख (काका) यांनी पोवाडा आणि शिवगीतांमधून उपस्थित मावळ्यांना स्फूर्ती चढवली.

हस्को हायड्रोलिक्स कामगार संघटनेतर्फे 10 टिकाव, 10 खोरे, 10 घमेले असे पाच हजार रुपयांचे साहित्य दिले. बजरंग दल मावळ यांच्याकडून गडमाहिती व नकाशा फलक दिला. वडगांव मावळ येथील न्यू इग्लिश स्कूलच्या 1986 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी ग्रुपने 30 हजार रुपयांची स्वयंपाकाची भांडी दिली. तसेच उपस्थितांनी गडाकरीता रोख आणि धनादेशाव्दारे सुमारे 1 लाख 71 हजार रक्कम दिली. त्यानंतर मदत करणा-यांचे सन्मान करण्यात आले.

  • डॉ. प्रमोद बो-हाडे यांनी शिवपराक्रमाचा इतिहास उलगडला. प्रमुख पाहुणे श्रीमंत सत्यशिलराजे दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधिर ढोरे, विनायक रेणके यांनी केले. संस्थेचे शिवव्याख्याते अॅड. रविंद्र यादव यांनी आभार मानले. गडाची स्वच्छता करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.