BNR-HDR-TOP-Mobile

Maval : नव्या पिढीचं नेतृत्व पाहायचंय, याची देही, याची डोळा – शरद पवार

एमपीसी न्यूज – देशाचे राजकारण बदलत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ज्याप्रमाणे 1967 मध्ये तरुणांना संधी दिली तोच विचार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य चालवताना नव्या पिढीतील तरुणांना लोकसभेसाठी संधी दिली आहे. संग्राम जगताप, धनंजय महाडिक, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे असे तरुण चेहरे पुढे आणले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविताना या पिढीतील नेतृत्वाला याची देही, याची डोळा पहायचे आहे, असे भावनिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे कवाडे, गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रमेश साळवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, म्हाडाचे माजी अध्यक्ष विजय कोलते, माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, आमदार जयदेव गायकवाड, आमदार रामराव वळकुटे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते पै चंद्रकांत सातकर, शेकापचे तालुकाध्यक्ष माऊली तलावडे,एस आर पी चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, अॅड दिलीप ढमाले, जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुका अध्यक्षा राजश्री राऊत, शबनम खान, शोभा कदम, यादवेद्र खळदे, गणेश काकडे, गणेश खांडगे, दीपक मानकर, दीपक हुलावळे, किशोर भेगडे, अंकुश आंबेकर, मयुर कलाटे, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, ” ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मोदींनी भूमिका मांडली, जनतेच्या हिताचे काम करीन, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील, बेकारांना काम देईन, ऐक्य निर्माण करीन, शेतकरी वर्गासाठी काम करीन, या कामासाठी मला मत देऊन संधी द्या परंतु संधी देऊनही मोदींनी सामान्य जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली. नोटाबंदी, काळा पैसा बाहेर काढू .काळा पैसा उद्योगपतींकडे असतो, सामान्य लोकांकडे असणारे चलन हे काळा पैसा असू शकत नाही. असे ही पवार म्हणाले. ह्या सरकारने सामान्य लोकांचे जीवन समृद्ध करणे गरजेचे होते, परंतु सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले. काँग्रेसच्या राजवटीत ख-या अर्थाने विकासाला प्राधान्य दिले आणि चाकण, तळेगाव, शिरूर,हिंजवडी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून रोजगार निर्मिती झाली. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आजच्या घडीला पाच लाख टन ऊस गाळप करतो आहे. ह्या कारखान्यामुळे शेतकरी बदलला आहे. त्यांचे जीवन सुधारण्यासाठी कारखानदारी व साधनांची उभारणी केली म्हणूनच विकास झाला” असे पवार म्हणाले.

पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारातील मुद्द्यांचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले,”पाकिस्तानने अभिनंदनची केलेली सुटका ही जिनिव्हा करारातील जखमी सैनिकाला अटक करता येणार नाही या तरतुदीनुसार केली आहे. अमेरिकेसह जगातील विविध राष्ट्रांच्या दबावापुढे नमून पाकिस्तानने अभिनंदनला भारताच्या ताब्यात सुखरूप दिले. असे असताना त्याचे श्रेय मोदी लाटत आहेत. जर त्यांनी खरेच अभिनंदनला सोडवून आणले असेल तर मग 56 इंचाची छाती कुलभूषणच्या बाबतीत 12 इंचाची का ? असा प्रश्न मी त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर विचारीन” असे पवार म्हणाले.

नोटबंदी हा मोदींनी अविचाराने घेतलेला निर्णय होता. त्यामुळे राज्यातील 15 लाख लोकांची नोकरी गेली, काळा पैसा हा मोठ्या लोकांकडे, उद्योजकाकडे असतो हे माहीत असूनही सर्वसामान्य माणसाला त्रास देणारी त्यांची मानसिकता देशाला घातक आहे. मोदींनी सत्तेचा उपयोग सामान्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी कितपत केला असा सवाल करताना पवार म्हणाले की, परदेश दौऱ्यातून भारताची प्रतिमा आणि देशाच्या हिताची जपणूक करणे हे पंतप्रधानाचे काम आहे. सहकारी मंत्र्यांना बरोबर घेऊन पूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी ते केले; मात्र मोदींनी एकट्याने ते केलेत आणि भारताच्या हिताची जपणूक केली की नाही ते माहीत नाही. अशी उपरोधिक टीकाही केली. काँग्रेसच्या काळात देशाने शेती, उद्योग आदि विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा व साधनसुविधांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. देशाच्या हितासाठी काही निर्णय ठामपणे घेण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी स्पष्ट बहुमत पाहिजे आहे. काँग्रेस व महाआघाडीस स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन करताना पार्थ पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची विनंती शरद पवार यांनी केली.

माजी खासदार नानासाहेब नवले म्हणाले, “पवार साहेबांनी भुकेल्यांना अन्न वाढले, सत्य असत्याचा झगडा चालू आहे. साहेबांनी पुणे जिल्ह्यातील धरणे बांधून शेतक-यांसाठी शेतीला पाणी दिले. म्हणून आपण सर्वांनी जाणीव ठेवणार की नाही. महाराष्ट्र हा राजकारणाचा कणा आहे” असेही नवले म्हणाले.

यावेळी विजय कोलते, जयदेव गायकवाड, रामराव वळकुटे, किरण गायकवाड, रमेश साळवे, पै चंद्रकांत सातकर, नानासाहेब नवले आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार कोतुळकर यांनी केले तर आभार जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2

.