BNR-HDR-TOP-Mobile

Maval : शरद पवार यांच्या उमेदवाराबाबतच्या ‘गुगली’ने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था

मावळातील उमेदवार नक्की कोण ?

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ मतदारसंघातून नातू पार्थ पवार निवडणूक लढविणार नाही….पार्थला उमेदवारी देण्याच्या निष्कर्षापर्यंत आलो आहोत….पार्थची उमेदवारी निश्चित नाही. मावळच्या उमेदवाराबाबत अशी तीन वेगवेगळी विधाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पार्थ पवार हेच उमेदवार असणार की ऐनवेळी आयात उमेदवार असणार याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

यावेळी मावळ मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तगडा उमेदवार देणार असल्याचे पक्षाकडून सांगितले जाते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाकडून संकेत देण्यात आले होते. पार्थ यांचे देखील मतदारसंघातील दौरे वाढले होते. त्यांनी देवदर्शनाला देखील सुरुवात केली आहे. पक्षाचे, मित्र पक्षाच्या पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात होते.

परंतु, शरद पवार यांनी पवार कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवायची असे सांगत पार्थ लढणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, त्या विधानामध्ये बदल करत पार्थ याला उमेदवारी देण्याच्या निष्कर्षापर्यंत आलो आहोत असे सांगितले. त्यानंतर पुन्हा पार्थची उमेदवारी निश्चित नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पार्थ पवार हेच उमेदवार असणार की ऐनवेळी दुस-या पक्षातील उमेदवार असणार याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीबाबत केलेली तीन वेगवेगळी विधाने

19 फेब्रुवारी रोजी लोणी काळभोर येथे पत्रकारांशी बोलताना आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार लढवणार नाहीत. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते.

11 मार्च रोजी पुण्यातील पत्रकार परिषदेत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा असल्याचे सांगत शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते. तसेच स्वत: माढ्यातून लढणार नसल्याचे सांगत तरुणांना संधी देणार असल्याचे ते म्हणाले होते.

13 मार्च रोजी शरद पवार यांनी मावळ मतदारसंघातील बुथ प्रमुख, कार्यकर्त्यांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देत पुन्हा एकदा ‘गुगली’ टाकला.

पण, पवार जरी मावळच्या उमेदवाराबद्दल संभ्रम निर्माण करत असले तरी देखील राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याचा अंदाज जाणकारांना नक्की आला आहे; मात्र सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.