Maval: लोकसभेला राष्ट्रवादीकडून संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर इच्छुक; पार्थसाठी शरद पवार नाहीत अनुकूल !

मावळ काबीज करण्यासाठी कामाला लागा; शरद पवार यांचा आदेश

एमपीसी न्यूज – राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय आढावा बैठका आज (मुंबईत) सुरु आहेत. मावळातून निवडणूक लढविण्यासाठी आपण सज्ज असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बैठकीत सांगितले. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मावळातून लढण्यास शरद पवार अनुकूल नाहीत. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणा-या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न पवार यांनी बैठकीत उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार आज मुंबईत लोकसभा मतदार संघानिहाय पदाधिका-यांच्या आढावा बैठका घेत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे याची माहिती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती पवार यांना दिली. पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळातून राजकारणात एंट्री करणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणा-या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न पवार यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर मोठे पवार अनुकूल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.