Maval: राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना ‘शेकाप’चे जयंत पाटील गैरहजर; चर्चेला उधाण

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची देखील दांडी

एमपीसी न्यूज – ज्या घाटाखालील शेकापच्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. त्याच शेकापचे सर्वेसर्वा, आमदार जयंत पाटील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना आज (मंगळवारी) गैरहजर होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. त्याच्याबरोबर काँग्रेसचा एकही बडा नेता फिरकला नाही. त्यामुळे आघाडीत सगळेच आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि शहरातील स्थानिक नेते उपस्थित होते. तर, दुसरीकडे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे यांचा अर्ज दाखल करताना महायुतीचे दिग्गज नेते हजर होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार राम ठाकूर यांच्यासह मावळ मतदारसंघातील सर्व आमदार उपस्थित होते.

  • पार्थ पवार यांचा अर्ज भरताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सर्वांना जाणवत होती. त्याची चर्चा देखील झाली. तसेच काँग्रेसचा एकही बडा नेते अर्ज भरताना उपस्थित नव्हता. त्यामुळे आघाडीत सर्वच आलबेल नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. शेकापचे आमदार बाळाराम पाटील, जयंत पाटील यांच्या भगिनी, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील हजर होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण मदार शेकापवर आहे. शेकापच्या ताकदीच्या जोरावारच राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जात आहे. शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील अर्ज भरायला हजर नव्हते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत बोलताना शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे म्हणाले, शेकापचे नेते जयंत पाटील यांना आज महत्वाचे काम होते. त्यामुळे त्यांनी पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्या भगिनी, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हेत्रे, एम. म्हेत्रे यांना पाठविले होते. शेकापनेच पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत मनापासून आहोत. पार्थ यांना निवडून आणण्यासासाठी आमचे नेते जयंत पाटील यांनी जोर लावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.