Maval/ Shirur: लोकसभा मतदारसंघात 2 हजार 404 अतिरिक्त ‘ईव्हीएम’

एमपीसी न्यूज –मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दोन ‘ईव्हीएम’ची आवश्‍यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सुमारे 2 हजार 404 अतिरिक्त ईव्हीएम ची मागणी केली होती. या अतिरिक्त मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता शिरूर आणि मावळ मतदारसंघातही 15 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएमची आवश्‍यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त 2 हजार 404 ईव्हीएमची मागणी केली होती. 

लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘ईव्हीएम’वर (बॅलेट युनिटवर) उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येते. यावर्षीपासून उमेदवाराचा फोटो देखील बॅलेट युनिटवर असणार आहे. हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते. एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे बसतात. निवडणुकीला उभे असणा-या सर्व उमेदवारांची नावे टाकल्यानंतर सर्वात शेवटी बॅलेट युनिटवर ‘नोटा’चा पर्याय देण्यात येतो.

त्यामुळे एका बॅलेट युनिटवर पंधरा उमेदवारांची नावे व ‘नोटा’ हा पर्याय देणे शक्य असते. प्रत्यक्षात मात्र पुणे लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार, बारामतीमधून 18 उमेदवार, मावळमधून 21 आणि शिरूरमधून 23 उमेदवार रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांच्या नावानंतर बॅलेट युनिटवर ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे मावळ आणि शिरुर मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. यामध्ये एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे असणार असून दुस-या बॅलेट युनिटवर उर्वरित उमेदवारांची नावे आणि ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार, बारामतीमधून 18 , मावळमधून 21 आणि शिरूरमधून 23 उमेदवार रिंगणात आहे. शिरूरमध्ये 2 हजार 227 मतदान केंद्र आणि मावळमध्ये 2 हजार 504 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम ठेवले जाणार आहेत. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून या मशीन जिल्हा प्रशासनाकडे आल्या असून संबंधित लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या मशीन सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.