Maval/ Shirur : प्रचारासाठी उरले केवळ 30 तास; बैठकांवर भर

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी आता केवळ 30 तास उरले आहेत. त्यामुळे महाआघाडी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. बैठकांवर भर दिला जात आहे. दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे उद्या (शनिवारी)पदयात्रा काढून दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.29 ) मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आत्तापासून केवळ 30 तास उरले आहेत. या शेवटच्या तीस तासांमध्ये जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून केला जात आहे. मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या असल्याने कोपरा सभा, बैठका, भेटीगाठीवर दिला जात आहे.

मावळमध्ये महाआघाडीचे पार्थ पवार आणि महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत आहे. पवार घराण्यातील उमेदवार असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्याची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. राज्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबद, बारामतीसह इतर भागातील कार्यकर्ते शहरात ठाण मांडून बसले आहेत. विभागनिहाय बैठका घेऊन पार्थ यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप, आरपीआय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झोकून दिले आहे. प्रभागनिहाय बैठकांचे सत्र आहे. प्रचारफेरी काढली जात आहे. पत्रके वाटली आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव यांच्यात जोरदार फाईट होत आहे. कोल्हे यांच्या रुपाने पहिल्यांदाच आढळराव यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. कोल्हे यांनी प्रचारफेरी, रॅली, कोपरा सभेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. तर, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यांनी प्रचारात जोर लावला आहे.

शेवटच्या तीस तासात जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवरांकडून प्रयत्न केला जात आहे. सर्वांसाठी एक-एक मिनिट महत्त्वाचा असून, नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराचे काउंटडाऊन सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.