Maval/ Shirur: ‘एक्झिट’ पोलने उमेदवारांची वाढविली धाकधूक

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना विविध खासगी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. काही एक्झिट पोलमध्ये मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार तर काही एक्झिट पोलनी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजयी होतील असा अंदाज वर्तविला आहे. तर, शिरुरमध्ये देखील काही एक्झिट पोलमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय दाखविला आहे. तर, काही पोलने शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव विजयी होतील असा अंदाज वर्तविला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलने मात्र उमेदवारांची धाकधूक वाढविली आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे 29 एप्रिल रोजी भवितव्य मशीन बंद झाले आहे. ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी (दि. 23) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात टफ फाईट झाली. दोघांमध्ये अतिशय चुरशीची, अटी-तटीची लढत झाली. निकाल दोन दिवसांवार आला असताना विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यामध्ये काहींनी पार्थ यांना तर काहींनी बारणे यांच्या विजयाचा अंदाज वर्तविला आहे. अतिशय चुरशीची निवडणूक झाल्याने मावळबाबत खात्रीपूर्वक कुणीच सांगत नाही.

शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. शिरुरबाबत देखील काही वृत्तवाहिन्यांनी डॉ. कोल्हे तर काहींनी आढळराव यांचा विजय होईल, असे अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रत्यक्षात गुरुवारी मतपेट्या उघडल्यानंतर चित्र समोर येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.