Maval/ Shirur: निकालास होणार उशीर; रात्री नऊ वाजेपर्यंत अंतिम निकाल येणार हाती

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या (गुरुवारी)सकाळी आठवाजल्यापासून होणार आहे. यंदा मतमोजणी होताना ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला विलंब होणार आहे. सकाळी दहापर्यंत पहिल्या फेरीचा कल हाती येऊ शकतो. अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे नऊ ते दहा वाजू शकतात.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. उद्या (गुरुवारी) सात वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रुम उघडण्यात येईल. त्यानंतर आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुरुवातील पोस्टल मते मोजली जाणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. एकूण 84 टेबलवरुन मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत.

एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यानुसार सुमारे 25 ते 29 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू केली जाणार नाही. पिंपरी मतदारसंघाच्या सर्वाधिक 29, चिंचवड 24, मावळ 27 आणि उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 25 फे-या होणार आहेत. एकूण मतदानापैकी पाच टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची मते मोजली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करायची आहे. त्यामुळे अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे दहा वाजू शकतात.

मतमोजणीवेळी मोबाईल आणता येणार नाही

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाठी उमेदवारांचे स्वतंत्र प्रतिनिधी असणार आहेत. प्रत्येकाकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रतिनिधी बदलता येणार नाही. या मतदारसंघातून दुस-या मतदारसंघात जाता येणार नाही. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाईल आणता येणार नाही. एकदा मतमोजणी कक्षात प्रवेश केल्यास बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडल्यास पुन्हा आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.