Maval/ Shirur : खासदार, आमदार, महापालिका पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी येथील ज्युडन इंग्लिश हायस्कूलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी भारती साबळे, मुलगी वेणू साबळे यांनी देखील मतदान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क बजाविताना आनंद वाटला. देशासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपले आद्य कर्तव्य बजाविले पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त सरकार आणणे आवश्यक आहे. मजबूत सरकार आणि विकासयुक्त सरकार आले पाहिजे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मोदी यांना म्हणजेच मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन साबळे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरव येथे आपला मतदानाचा हक्क बजाविला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळेल. भाजपची सर्वत्र हवा आहे. त्यामुळे महायुतीला मोठे यश मिळेल. मावळ लोकसभा मतदारसंघात 60 ते 65 टक्के मतदान होईल, असे अंदाज यावेळी जगताप यांनी व्यक्त केला.

भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सारिका भेगडे, आई कमल भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजाविला. तळेगावदाभाडे येथील भेगडे आळी विभागातील कैकाडी समाज प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा विश्वजीत भेगडे देखील उपस्थित होता.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भोसरी, लांडेवाडी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केले. पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांनी कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. चिखली, जाधववाडी येथील शाळेत त्यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आपली कन्या ऐश्वर्या हिच्या समवेत भोसरी इंद्रायणीनगर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सकाळी दहा वाजता निगडीत कुटुंबियांसह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी ललिता पवार, मुलगी ऐश्वर्या पवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात कुटुंबियासह मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी हर्षदा साने यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आज सकाळी कुटुंबियासह आपला मतदानाचा हक्क बजाविला. मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आकुर्डीतील काळभोरनगर येथील गोदावरी शाळेत गोरखे यांनी कुटुंबियासह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी डॉ. प्रिया गोरखे, आई पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.