Maval/ Shirur: निकालाचे काऊंट डाऊन ; मावळमधून बारणे की पार्थ, शिरुरमधून कोल्हे की आढळराव; उत्सुकता शिगेला

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आला असून काऊंट डाऊन सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा 23 मे कडे लागल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालाबाबत राज्यभर चर्चा सुरू आहे. मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे की पार्थ पवार आणि शिरुरमधून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव की डॉ. अमोल कोल्हे बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्याबाबतचे तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.

पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य 23 एप्रिल रोजी मतदानयंत्रात बंद झाले. दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे)कोरेगाव पार्क येथे ठेवण्यात आली आहेत. 23 मे रोजी कोरेगाव पार्क येथेच मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. तर, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे 29 एप्रिल रोजी भवितव्य मशीन बंद झाले आहे. ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 23 मे रोजी बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

पार्थ पवार यांनी एंट्री केल्याने वर्षभरापासून मावळ मतदारसंघ चर्चेत होता. पार्थ यांनी लोकसभा लढावयाची या इराद्याने मतदारसंघात लक्ष घातले होते. पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या शरद पवार यांच्या कुटुंबातील उमेदवार असल्याने राज्याचे मावळकडे लक्ष लागले. घराण्यातील उमेदवार असल्याने पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पार्थ यांना महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कडवे आव्हान दिले. मावळातील लढत अतिशय चुरशीची झाली. मावळ मतदारसंघात 59.49 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे पार्थ की बारणे बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीने शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली. डॉ. कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले. आरोप-प्रत्योरापांनी शिरुरची निवडणूक चांगलीच गाजली. डॉ. कोल्हे यांच्या रुपाने गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा पहिल्यांदाच आढळराव यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे शिरुरमधून डॉ. कोल्हे की आढळराव बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदान झाले आहे.

बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात लढत झाली. बारामतीमध्ये गेल्यावेळीपेक्षा दोन टक्के मतदान जास्त झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ईव्हीएम’ वर शंका उपस्थित करत बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यास ‘ईव्हीएम’ वरील सर्वांचा विश्वास उडेल असे वक्तव्य केल्याने देशाचे लक्ष बारामतीच्या निकालाकडे लागले आहे. तर, पुणे लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात सरळ लढत झाली. मतदान कमी झाल्याने या निकालाकडे पुणे शहराचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.