Maval/ Shirur : उमेदवार वाढले ! प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. मावळमधून 21 आणि शिरुरमध्ये 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि ‘नोटा’चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘ईव्हीएम’वर (बॅलेट युनिटवर) उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येते. यावर्षीपासून उमेदवाराचा फोटो देखील बॅलेट युनिटवर असणार आहे. हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते. एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे बसतात. निवडणुकीला उभे असणा-या सर्व उमेदवारांची नावे टाकल्यानंतर सर्वात शेवटी बॅलेट युनिटवर ‘नोटा’चा पर्याय देण्यात येतो.

त्यामुळे एका बॅलेट युनिटवर पंधरा उमेदवारांची नावे व ‘नोटा’ हा पर्याय देणे शक्य असते. प्रत्यक्षात मात्र मावळ मतदारसंघातून 21 आणि शिरुरमधून 23 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांच्या नावानंतर बॅलेट युनिटवर ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे मावळ आणि शिरुर मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. यामध्ये एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे असणार असून दुस-या बॅलेट युनिटवर उर्वरित उमेदवारांची नावे आणि ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ सामाविष्ट आहेत. या मतदारसंघात 2 हजार 504 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. तर, शिरुर मतदारसंघात शिरुर, आंबेगाव, जुन्नर, खेड-आळंदी, भोसरी आणि हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात 2 हजार 296 मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत.

याबाबत बोलताना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी म्हणाल्या, ”मावळ लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट आवश्यक आहेत. तेवढी यंत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये पहिल्या बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे असतील. तर, दुस-या बॅलेट युनिटवर उर्वरित उमेदवारांची नावे आणि ‘नोटा’चा पर्याय असणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.