Maval/Shirur : मावळ आणि शिरूरमध्ये उत्साहात मतदान (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आज लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पार पडतोय. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह 17 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून राज्यात एकूण 3 कोटी, 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात काटे की टक्कर आहे. तर, शिरुरमधून महायुतीचे शिवाजीराव आढळराव यांना महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी कडव आव्हान दिल आहे.

मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज, सोमवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी थंडा तर काही ठिकाणी उत्साही प्रतिसाद मतदारांमध्ये पहावयास मिळाला. विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आपापल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ऊन कमी असल्याने वृध्द, अपंग महिलांनीही मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजण्याच्या अगोदरपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. चिंचवड येथील महात्मा फुले शाळेत मतदानासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक जणांनी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर लगेच मतदानासाठी रांग लावली.

सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे उन्हाचा तडाखा असल्यामुळे मतदार हैराण झाल्याचे चित्र होते. अनेक मतदान केंद्राच्या बाहेर 200 मीटरचा परिसर सोडून विविध पक्षांचे प्रतिनिधी टेबल टाकून मतदारांना यादीतील नाव शोधून देण्याचे काम करताना दिसत होते. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावल्यामुळे मतदानाची प्रक्रिया शहरात शांततेत सुरु असल्याचे चित्र होते. मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. मतदान असल्याने शहर, उपनगरांतील बाजारपेठा, रस्त्यांवर शांतता दिसून आली.केंद्राच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. स्विकृत नगरसेवक सुनील कदम व दिनेश यादव यांनीही मतदानाचा हक्क बजावला

मागील तीन दिवसांपासून राज्यातील आणि पुणे व पिम्परी चिंचवडमधील तापमानाच्या आकड्यांनी आधीचे सगळे रेकॉर्ड पार केले आहेत. त्यात मागच्या फेरीत पुण्यात खूपच कमी मतदान झाले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळी मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा वाढण्याआधीच मतदानाचा हक्क बजावायचा या हेतूने मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. मात्र आज मागील दोन- तीन दिवसांपेक्षा तापमान कमी होते. सकाळी अकरा वाजता अंदाजे 36 अंश तापमान होते. पण मतदारांचा उत्साह त्यापेक्षा जास्त होता. त्यामुळे वातावरणातील वाढत्या तापमानापेक्षा मतदानाचे तापमान जास्त होईल असे म्हणायला हरकत नाही.

प्रथम मतदानाचा हक्क बजावताना युवा वर्गात उत्साही वातावरण होते. गुरुवारी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर ही परिस्थिती दिसून आली. प्रथमच मिळालेले मतदान ओळखपत्र दाखवत आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करून बाहेर येताना अनेकांनी छायाचित्रकारांना पोज दिली. बोटावर लागलेली शाई दाखवण्यात अनेकांना अप्रूप वाटत होते.

डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद

भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे भेट देत असताना माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्री इंदुबाई विठोबा लांडे या मतदानासाठी आलेल्या असताना डॉ. कोल्हे यांनी त्यांना वाकून नमस्कार करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे उपस्थित होते.

मतदारयादीत नाव नसल्यामुळे मतदारांमध्ये निराशा

मतदानाचा दिवस उजाडला तरी मतदारयाद्यांमधील गोंधळ कायम आहे. अनेक नागरिकांची नावे वगळण्यात आली असून काही मतदारांची दुबार नोंदणी असल्याचे उघड झाले आहे. तर, मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये शेवटच्या दिवशी अर्ज करूनही मतदानासाठी नाव आले नसल्यामुळे काही मतदारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

 

 

Kishor Dhokre

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.