Maval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला

एमपीसी न्यूज – गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे घड्याळ डौलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, शिरुरमधून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. शिरुरमधून कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून निकालाबाबतची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.

मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे 29 एप्रिल रोजी भवितव्य मशीन बंद झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांच्या भवितव्यांचा फैसला उद्या होणार आहे. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह 23 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. उद्या मतपेट्या उघड्यानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

घराण्यातील उमेदवार असल्याने मावळमध्ये पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, शिवसेनेचे श्रीरंग बारणे हॅटट्रिक करत मावळवर शिवसेनेचा फगवा फडकाविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, शिरुरमध्ये शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आढळराव चौकार मारतात की राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे आढळरावांना ‘क्लिन’ बोल्ड करतात याकडे राज्यासह मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.