Maval: शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही –  सर्जेराव मारनुरे

एमपीसी न्यूज – देशहित आणि हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे दोघे मतभेद संपवून एकत्र आले आहेत. शहरहित डोळ्यासमोर ठेवून दोघे एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे कोणी काही बरळत आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या कोणत्याही नेत्यावर टीका केल्यास सहन केले जाणार नाही, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख सर्जेराव मारनुरे यांनी दिला आहे. 
दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीचे माजी सभापती असलेल्या विलास नांदगुडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायचे असल्याचे सांगत भाजपच्याच नेत्यांवर टीका केली होती. त्याला शिवसेना विभागप्रमुख सर्जेराव मारनुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. नांदगुडे यांची दिशा भरकटली आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा देतात आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे त्यांना कोणताही विचार राहिला नाही. त्यांचा गोंधळ उडाला आहे.

  • देशहित डोळ्यासमोर ठेवून भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते संपूर्ण मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. शहरहित पाहून आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे दोघे मतभेद संपवून एकत्र आले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं मित्रपक्षाचे कार्यकर्ते मेहनत करत आहेत. मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर महायुतीचे बारणे निवडून येणार आहेत, असा विश्वासही मारनुरे त्यांनी व्यक्त केला.
आमदार जगताप आणि खासदार बारणे दोघे एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहेत. त्यामुळे विरोधक महायुतीच्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करत आहेत. परंतु, कोणी काही करो भाऊ आणि आप्पा एकत्र राहणार आहेत. भविष्यात दोघे एकत्र राहून शिवसेना-भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करणार आहेत. त्यामुळे यापुढे महायुतीच्या नेत्यांवर कोणी टीका करु नये. टीका केल्यास खपवून घेतले जाणार नाही. अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख मारनुरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.