Maval: मावळात शिवसेना हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी बाजी मारणार?

एमपीसी न्यूज – राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळातून आपले नशीब आजमावले आहे. त्यांना महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी कडवे आव्हान दिले. दोघांचे नशीब मतदानयंत्रात काल बंद झाले असून मावळात शिवसेना हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 23 मे रोजी मतदानयंत्रे उघडल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल.

मावळ लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत असे सहा विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येत आहेत. मावळातून 2009 मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर यांनी बाजी मारली. 2014 मध्ये श्रीरंग बारणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आता 2019 ला देखील बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने घरातील उमेदवार दिला होता.

  • घराण्यातील उमेदवार असल्याने पवार कुटुबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पवार घरातील आणि तरुण, नवीन चेहरा असलेले पार्थ पवार उमेदवार असल्याने राष्ट्रवादीतील सर्व गट-तट पहिल्यांदाच एक झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर घाटाखाली वर्चस्व असलेला शेतकरी कामगार पक्ष यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. तर, भाजप-शिवसेनेचे नेत्यांनी देखील एकदिलाने प्रचार केला आहे. त्यामुळे मावळची निवडणूक अतिशय अटी-तटीची झाली असून 59.49 टक्के मतदान झाले आहे. मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिला आहे हे 23 मे रोजी मतदानयंत्रे उघडल्यावर समजणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.