Maval: शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे कोट्यधीश!

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मावळ लोकसभेचे शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे 82 कोटी 80 लाख रूपयांची आहे. बारणे यांच्यावर देहूरोड, वडगाव मा‌वळ आणि चाकण येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दिली आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बारणे यांनी माहिती दिली आहे. बारणे यांच्याकडे 69 कोटी 60 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, 13 कोटी 20 लाख रूपयांची जंगम मालमत्ता आहे. बारणे यांच्या पत्नी सरिता यांच्याकडे 18 कोटी 94 लाख रूपयांची स्थावर आणि 57 लाख 5 हजार रूपयांची जंगम मालमत्ता आहे.

  • दहावी अनुत्तीर्ण असलेल्या बारणे यांचे शेती, वीट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन असून त्यांना खासदार म्हणून मिळणारे ‌मानधन, शेअर, भाडे, ठेवी यामधून देखील उत्पन्न मिळत आहे. बारणे यांच्यावर देहूरोड, वडगाव मा‌वळ आणि चाकण येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

खासदार बारणे यांच्याकडे 36 लाख रूपये रोख रक्कम असून विविध बँकांमध्ये त्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. मुळशी येथील माण, ताथवडे, थेरगाव यासह मावळ तालुक्यात काही ठिकाणी त्यांची जमीन आहे. काही कंपन्याच्या शेअरमध्ये त्यांची गुंतवणूक असून बँकामध्येही त्यांनी पैसे गुंतविले असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही बँकांची कर्ज देखील त्यांनी घेतलेली आहेत.

  • बारणे यांच्याकडे 96 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंज, टोयाटो फॉर्च्युनर अशी वाहने आहेत. हिऱ्याची अंगठी, सोने, घड्याळे, मोबाईल, रिव्हॉल्वर आहे. पत्नी सरिता यांच्याकडे पाच किलो चांदी असून त्याची किंमत अडीच लाख रूपये आहे. तसेच पत्नी यांच्याकडे कर्णकुंड्या, सोने, मोबाईल असल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.