Maval: शिवसेनेचे श्रीरंग बारणे अन्‌ राष्ट्रवादीचे पार्थ पवार दोघांचा विजयाचा दावा

वंचित आघाडीचे राजाराम पाटील म्हणतात मला विजयाची दाट शक्यता

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच आघाडी मिळेल, असा ठाम विश्वासही दोघांनी मतदान पार पडल्यानंतर व्यक्त केला. तर, वंचित आघाडीचे राजाराम पाटील यांनी आपल्या विजयाची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवारी) मतदान पार पडले आहे. 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 58.21 टक्के मतदान झाले आहे.

  • मतदान पार पडल्यानंतर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. मावळमधील मतदारांमध्ये उत्साह जाणवला. मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडला. मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात येणा-या सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळेल. महायुतीचा विजय निश्चित आहे. मतदारांनी विकासाला मत दिले आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने महायुतीचा विजय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाआघाडीचे पार्थ पवार म्हणाले, ”मावळ लोकसभा मतदारसंघात चांगल्या पद्धतीने आणि शांततेत पार पडले. मावळच्या जनतेने मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. मावळ मतदारसंघात 58.21% इतके मतदान झाले आहे. त्यामुळे सलग सुट्ट्या असून देखील मावळच्या जनतेने मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे. माझा मावळच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून मावळच्या विकासासाठी मला सहाही विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्य मिळेल. मावळची जनता मला निवडून देईल असा विश्वास आहे”.

  • वंचित आघाडीचे राजाराम पाटील म्हणाले, ”मतदारांमध्ये मोठा उत्साह जाणवला. वंचित मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात मतदान केले. वंचित मतदार आक्रमक झाला होता. महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे आपण निवडून येण्याची दाट शक्यता आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.