Maval: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधीत सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे आर्थिक मदत मिळाली पाहिजे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित रहता कामा नये अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार, कृषी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच टाटा पॉवरच्या क्षेत्रामधील भातशेती व इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांना रक्कम देता येत नसेल. तर, त्यांना विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य मिळावे अशाही सूचना दिल्या.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. मावळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकाच्या नुकसानीचा वडगाव, मावळ येथील तहसील कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला तहसीलदार मधुसुदन बर्गे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी व कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर व शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यावेळी अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतः 4 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मावळ तालुक्यामध्ये 178 गावे बाधीत असून, बाधीत शेतकऱ्यांची संख्या 12 हजार 714 आहे. यामध्ये 5391.18 हेक्टर जागेवर भातशेती असून 4.55 हेक्टर जागेवर भुईमूग, 0.20 हेक्टर फुल पिके, 38.97 हेक्टर सोयाबीन व 1.87 हेक्टर इतर पिकाचे नुकसान झाले आहे. लागवडीतील जवळपास 33% पेक्षा जास्त विविध पिकांचे नुकसान झाल्याचे कळते. या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार हेक्टरी 20 हजार 400 रूपये नुकसान भरपाई मिळणार असून या संपूर्ण नुकसानीची भरपाई 910 कोटी 91 लाख 556 रूपये मिळणार आहे.

या मध्ये 2079 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामध्ये अंदाजे विमा नुकसान क्षेत्र 543.76 इतके आहे. तर, कर्जदार 498.76 असून बिगर कर्जदार 45 आहेत. या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना त्यांची पूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे.

तहसीलदार बर्गे म्हणाले, “नुकसानाची संपूर्ण सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल. तसेच खासदार बारणे यांनी दिलेल्या सूचनांची अमंलबजावणी करून योग्य ती कारवाई केली जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like