Maval: यंदा प्रथमच असणार दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर ‘हेल्पिंग डेस्क’

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदार राजासाठी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर विनामूल्य विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मदतीला विद्यार्थी असणार आहेत, पिण्यासाठी शुद्ध पाणी, बसण्यासाठी डेस्क, खुर्ची, लहानग्यांसाठी अंगणवाडी सेविका किंवा आशाताई हे मदतीला असणार आहेत.

मतदान केंद्रांवरील कर्मचारी व मतदारांसाठी सुविधा देण्याबाबतच्या मिळालेल्या सूचनेनुसार सहायक निवडणूक अधिका-यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह अन्य शहरांमध्ये बुथस्तरावर, तर ग्रामीण भागात तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचा-यांपासून मतदार राजाचीही काळजी घेतल्याचे यावरुन दिसून येत आहे.

दिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनातर्फे देण्यात आलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. मात्र, मोफत सायकल उपलब्ध झाली नाही. तर, भाडेतत्वावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदाराला मतदानासाठी मदत करण्यासाठी शालेय (शक्यतो एनसीसी) विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळेच्या मुलांची नावे अगोदरच कळवायची आहेत. या मुलांनी स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे असून, त्यांना केवळ फूड पाकीट दिले जाणार आहे.

तीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र (हेल्प डेस्क) म्हणून असणार आहे. त्या खोलीवर तसा फलक असणार असून त्या ठिकाणी मिळणा-या सुविधांचा उल्लेख त्या फलकावर असणार आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, रांगेत उभा राहावे लागत असेल, तर बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी पाण्याच्या जारवाल्यांचे संपर्क क्रमांक घेतले गेले आहेत. महिला मतदारांच्या कडेवर मुल असेल, तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा आशाताईंची नियुक्ती केली जाणार आहे. या अंगणवाडी सेविका किंवा आशाताईंना मानधन दिले जाणार आहे.

या लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचा-यांच्या जेवणाची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक कर्मचा-यांना विशेष भत्ता दिला जातो. त्यातूनच हा खर्च भागवायचा असून, त्यासाठी ग्रामीण भागात महिला बचत गटांवर जबाबदारी सोपवली आहे. शहरी भागात मतदान केंद्राच्या जवळच्या दोन खानावळीचे संपर्क क्रमांक घेण्यात आले असून, त्या ठिकाणाहून जेवण मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.