Maval: निगडे गावात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – निगडे (मावळ) येथे मॅजिकबस इंडिया फाऊंडेशनने हायजेनिक रक्तदान शिबिर आयोजित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले गेले. शनिवार (दि 25) एप्रिल सकाळी 10 ते 3:00 या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मॅजिकबस शुभारंभ प्रकल्पांतर्गत  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या पद्धतीने रक्तदान शिबिर पार पाडले.

शनिवारी सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली गेली. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे संस्थेचे विकास मोढवे यांनी सांगितले. पिंपरी सेरोलॉजिकल इनस्टिट्यूट ब्लड बँक यांच्या माध्यमातून रक्त संकलन केले गेले.

राज्यात दररोज साधारण पाच हजार रूग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले.

सदर आवाहनाला प्रतिसाद देत निगडे गावातील अनेक तरुण मित्रांनी रक्तदान केले, गावातील महीला नागरीकांनीही शिबीरामधे सहभाग घेतला. शिबीरासाठी सतीश थरकुडे, विकास भांगरे,अजय बधाले, समीर भागवत यांनी विशेष सहकार्य केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन संस्थेने त्यांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.