Maval : भर रस्त्यात कार थांबवून कंपनी अधिकाऱ्यावर हल्ला, केले दोन्ही पाय फ्रॅक्चर  

विशाल लॉन्स समोर त्यांच्या कारला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली.

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी मधील डाॅन्गशिन कंपनीतील एका अधिकाऱ्यावर दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील विशाल लॉन्स समोर घडली. 

हल्लेखोर फरार झाले आहेत.

मुथन्ना के. सुबय्या ( वय 57, रा. टाटा हाऊसिंग सोसायटी, वडगाव मावळ) असे हल्ला झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबय्या हे गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या कारमधून कंपनीतून घरी चालले होते. विशाल लॉन्स समोर त्यांच्या कारला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. काय झाले हे पाहण्यासाठी ते कार थांबवून बाहेर येत असताना मोटारसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पायावर हॉकीस्टिकने हल्ला केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सुबय्या यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. वडगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.