Maval: मावळमध्ये कडक नाकेबंदी करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रशासनाला सूचना

आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करू नका, रेशनचे धान्य द्यावे; मावळमधील कोरोनाच्या परिस्थितीचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, ही समाधानाची बाब आहे. परंतु, बाजूच्या पिंपरी-चिंचवड, पनवेल शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मावळमध्ये येणे-जाणे असते. त्यामुळे पुढील काळात मावळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यादृष्टीकोनातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. कडक नाकेबंदी करावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाल्या दिल्या आहेत. तसेच आदिवासी पाड्यावरील नागरिकांना रेशनचे धान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, सरकारी पातळीवर केल्या जाणा-या उपाययोजनांचा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) सविस्तर आढावा घेतला. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस उपधिक्षक गजानन टोणपे, तळेगावदाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वडगावच्या सुवर्णा ओगले, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पवार, वैद्यकीय विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, आत्तापर्यंत मावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. हे प्रशासनाचे मोठे यश आहे. भविष्यात देखील मावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. नागरिकांनी जागरुक रहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. मुंबईवरुन काही कामगार चालत आले होते.

या कामगारांसाठी, अडकून पडलेल्या नागरिकांसाठी चार ठिकाणी अन्नछत्र, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवन दिले जात आहे. बाहेरील कर्मचा-यांची जेवणाची व्यवस्था चोखपणे केली आहे. लोणावळा, तळेगावमध्ये 156 नागरिकांना क्वारंटाईन केले आहेत.

आदिवासी भागातील नागरिकांना पुरेसे रेशन देण्यात यावे. त्यांना कोणतीही अडचण येता कामा नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्या तक्रारींचा निपटारा करावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. मावळ तालुक्यात रेशनच्या 171 दुकांनामधून धान्याचे वितरण केले जाते.

धान्याचे सर्वांना नियोजनपुर्वक वितरण करावे. रेशनमधील धान्याचा काळाबाजार, साठेबाजार कोणीही करु नये. साठेबाजार करणा-या दुकानदारांची तत्काळ जिल्हाधिका-यांकडे तक्रार करावी.

तळेगावदाभाडे, लोणावळा, वडगाव शहरातील काही खासगी ओपीडी अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वच रुग्ण सरकारी रुग्णालयात येत असल्याने ताण येत आहे. त्यामुळे खासगी ओपीडी सुरु कराव्यात. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. लॉकडाउनचे कठोर पालन करावे, अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या आहेत.

तसेच कोरोनाविरोधात लढणा-या अधिकारी, कर्मचा-यांनी नागरिकांसह स्वत:चीही काळजी घेण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.