Maval: निवडणुकीच्या परीक्षेत मात्र सुनील शेळके ‘फर्स्ट क्लास’!

एमपीसी न्यूज- सार्वजनिक जीवनात शिक्षणापेक्षा कर्तृत्व, कल्पकता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, जनसंपर्क यालाच सर्वसामान्य जनता महत्त्व देत असल्याचे मावळ विधानसभा मतदारसंघातील निकालावरून दिसून आले. केवळ आठवीपर्यंत शिकलेल्या सुनील शेळके यांना निवडणुकीच्या परीक्षेत मात्र जनतेने 67.56 टक्के इतके घसघशीत गुण देत ‘फर्स्ट क्लास’ने विधानसभेत पाठवले आहे.

मावळच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने शेळके यांचे शिक्षण हा प्रचाराचा मुद्दा केला होता. जाहीर भाषणांमधून, सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओ क्लिप्स मधून भाजपने शेळके यांची खिल्ली उडवली होती. आमदार हा किमान पदवीधर तरी असावा, या मुद्द्यावर भाजपने प्रचारात भर दिला होता. पण मावळच्या जनतेने उमेदवाराच्या शिक्षणाला फार महत्त्व दिले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

शेळके यांना 1लाख 67 हजार 712 मते मिळाली ती झालेल्या एकूण मतदानाच्या तब्बल 67.56 टक्के आहेत. भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना 73 हजार 770 मते मिळाली. त्यांची मतदानाची टक्केवारी 29.72 इतकी आहे. शेळके यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना मिळून केवळ 32.44 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे जनतेच्या परीक्षेत ते ‘काठावर पास’ देखील होऊ शकलेले नाहीत.

शेळके यांचे शालेय शिक्षण कमी झाले असले तरी व्यवसाय, नातेसंबंध, मैत्री, समाजकार्य, राजकारण अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कमी शिक्षण असूनही जीवनात यशस्वी झालेल्या अनेक मान्यवरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेळके यांनी जीवनात वाटचाल केली. त्यामुळे मावळच्या जनतेने शेळके यांच्या कमी शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत त्यांना मतांच्या रुपाने भरभरून गुण दिल्याचे पहायला मिळत आहे.

‌शेळके यांना निवडणुकीत यश मिळाले असले तरी शिक्षण अर्धवट राहून गेल्याची खंत त्यांना वाटते. आपले कमी शिक्षण झाले असले तरी तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घेऊन जीवनातही उज्ज्वल यश मिळवावे, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. जीवनात शिक्षणाचे महत्त्व कोणालाही नाकारता येणार नाही. माझे शिक्षण काही कारणास्तव राहून गेले असले तरी मावळातील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात मी कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.