_MPC_DIR_MPU_III

Maval: आंदर मावळात अतिवृष्टीने भातपिकाचे नुकसान, आठवड्यात पंचनामे करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – आंदर मावळात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे आतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बाबत माहिती मिळताच मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून आज (मंगळवार) आंदर मावळचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एक आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश शेळके यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले.

_MPC_DIR_MPU_IV

आंदर मावळात अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक आडवे झाले असून अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने पिक वाहून गेले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आमदार सुनील शेळके यांनी वडेश्वर, माऊ, लष्करवाडी, गभालेवाडी, दवणेवाडी या गावांत अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई कदम, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरचिटणीस सुदाम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, सरपंच गुलाब गभाले, कशाळ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभापती अनिल जाधव, माजी सरपंच छगन लष्करी तसेच नारायण मालपोटे, सहादू शिंदे, संदीप लष्करी, मुकुंद खांडभोर आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटामुळे मावळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विनाविलंब नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेशही त्यांनी दिले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.