Maval: टाकवे बुद्रुकमध्ये पुढील तीन दिवस100 टक्के लॉकडाऊनचा निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर टाकवे बुद्रुक व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायत प्रशासन यांची पोलीस पाटील अतुल असवले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी टाकवे बुद्रुक गावात  ( दि 10 ते 12 ) एप्रिल या कालावधीत रुग्णालय व औषधालय सोडून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टाकवे व्यापारी असोसिएशनने दिली. 

यावेळी टाकवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया अनिल मालपोटे, उपसरपंच रोहीदास असवले, माजी उपसरपंच अविनाश असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, सदस्य उमाकांत मदगे, उद्योजक अनिल मालपोटे, नंदु असवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मोढवे, उल्हास असवले यांच्यासह व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत शुक्रवार (दि. 10) ते रविवार (दि. 12) तीन दिवस टाकवे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत एकमताने निर्णय झाला.

या तीन दिवसांच्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचे ठरवले असून ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. टाकवे बुद्रुक नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 तरतुदीच्या नुसार टाकवे बुद्रुक हद्दीतील हॉस्पिटल व मेडिकल सोडून सर्व व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत. यादिवसात  सकाळी 10 वाजेपर्यंत दूधवाले व कडबाकुट्टी चालू राहील. हॉस्पिटल व मेडिकल पूर्ण दिवस चालू राहील. तर किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री आदी अत्यावश्यक सेवा पूर्ण बंद राहतील.

आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी कामशेत मध्ये येऊ नये, आपल्या घरातच बसावे, लॉकडाऊनचे नियम काटेकोर पणे पाळावे, अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी कामानिमित बाहेर पडावे, विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.